हडपसर मधुन महाविकास आघाडीकडे रशिद शेख यांच्या उमेदवारीची मागणी
महाविकास आघाडीने मुस्लिम व अल्पसंख्यांकांना 15 टक्के उमेदवारी जाहीर करावी
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कडून मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाच्या घटकांना सत्तेतील भागीदारी देण्याच्या उद्देशाने 15 टक्के उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थायी समितीचे माजी अघ्यक्ष रशिद शेख यांनी आज पुणे येथे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी व जमियत उलमा यांच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान वाचविणे व देशातील धार्मिक धृवीकरणाचे वातावरण संपवावे या उद्देशाने मुस्लिम व इतर अल्पसंख्यांक समुदायाने देशभरात इंडिया अलाईन्स व राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचा जोरदार पराभव केलेला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही अटी व शर्ती शिवाय मुस्लिम समुदायाने केलेल्या मतदानाच्या अनुषंगाने तसेच योग्य प्रतिनिधित्वाचा मुद्द्यावर महाविकास आघाडीने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निमित्ताने करावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
पंधरा टक्के प्रतिनिधीत्वाच्या मागणीचे निवेदन राज्यातील महाविकास आघाडीचे नेते मा. श्री शरदचंद्र पवार साहेब, मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच मा. श्री नानासाहेब पटोले यांना लिखित स्वरूपात पाठवण्यात आल्याची माहीती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली यावेळी ” अल्पसंख्यांक समुदायाला या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करून नेमक्या किती जागा मिळणार आहेत ? याची आकडेवारी त्यांनी 22 ऑक्टोंबर जाहीर करणे अपेक्षित आहे . ” असे देखिल डंबाळे यांनी सांगितले.”
पश्चिम महाराष्ट्रातून हडपसर मतदार संघ मुस्लिमांसाठी सुरक्षित असल्याने या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला आहे. या ठिकाणी मिळणाऱ्या उमेदवारीमुळे जवळपास पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात व पश्चिम महाराष्ट्रातील 84 मतदार संघात याचा सकारात्मक संदेश जाणार असल्याने महाविकास आघाडीने माझ्या उमेदवारी बाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा या पत्रकार परिषदेतुन रशिद शेख यांनी व्यक्त केली.
दरम्यान निवडणुकीसाठीची संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली असून या अनुषंगाने मतदारसंघात 20 पेक्षा अधिक बैठका घेऊन व्यापक सहमती मिळवण्यात आल्याचेही रशिद शेख यांनी सांगितले. योग्य प्रतिनिधीत्व न दिल्यास महाविकास आघाडीचा हक्काचा मतदार नाराज होऊन तो आपला असंतोष अन्य मार्गाने व्यक्त करण्याची शक्यता आहे. हरियाणा येथे भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय हा धक्कादायक स्वरूपाचा असून इंडिया अलायन्सच्या धोरसोड वृत्तीमुळे अल्पसंख्यांक व धर्मनिरपेक्ष मतदारांच्या नाराजीचाच हा फटका आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असे आम्हाला वाटते त्यामुळे महाविकास आघाडीने तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. अशी भुमिका मुस्लिम नेते जाहीद शेख यांनी मांडली.
हडपसर मधुन रशिद शेख यांच्या उमेदवारीची मागणी हडपसर विधानसभा मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व अल्पसंख्यांक समाजाचे नेते रशीद शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन जमीयत उलमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुक्ती शाहीद यांच्या नेतृत्वा खालिल शिष्टमंडळाने केली आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा अशी भुमिका मुक्ती शाहीद यांनी मांडली.
राज्यातील 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक स्वरूपात असून स्वबळावर 20 ते 22 जागांवर ते निवडून येण्याची खात्री आहे व तशी चाचणी देखील स्थानिक इच्छुक उमेदवाराकडून सुरू आहे. अशी माहीती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे सरचिटणीस लुकस केदारी यांनी दिली.