पर्वती मतदारसंघासाठी ‘विकासाची दशसूत्री’ दिशादर्शक : आबा बागुल
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी तयार केलेली ‘विकासाची दशसूत्री’ दिशादर्शक ठरणार आहे. पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढविताना, सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांतून नागरिकांची सुटका करून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘विकासाची दशसूत्री’ हा जाहीरनामा निश्चितच आधारवड ठरणार आहे. त्यामुळे येत्या बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी हिरा निशाणीसमोरील बटन दाबून विजयी करा आणि ‘विकासाची दशसूत्री’साठी अनुक्रमांक’ दहा’ लक्षात ठेवा, असे आवाहन अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी केले आहे.
आबा बागुल म्हणाले की, विकासाच्याबाबतीत गत दहा वर्षात मतदारसंघाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, सुरक्षितता, कचरा, रोजगार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण यावर आधारित ‘विकासाची दशसूत्री’ जाहीरनामा मतदारसंघाच्या विकासाला दिशा देणार आहे. पाच वर्षात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे.
वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शहरांतर्गत रिंग रोड(एचसीएमटीआर ), बीआरटी मार्गावर भुयारीमार्ग, ग्रेडसेपरेटर उभारणी,मुबलक व समान पाणीपुरवठ्यासाठी ऑनलाईन वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टीम, दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलच्या धर्तीवर पाच शाळांची उभारणी, आधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय, निरामय आरोग्यासाठी रुग्णालये,मॅटर्निटी होम, युथ सेंटरद्वारे पाच वर्षात दहा हजार तरुणांना स्वयंरोजगार देण्याचे नियोजन, गुन्हेगारी मुक्त मतदारसंघासाठी ‘एआय’तंत्रज्ञानावरील स्वयंचलित सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पोलिसांना पाठबळ, महिला सक्षमीकरणासाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबणार नाही यासाठी पावसाळी चेंबरमध्ये बोअर होल्स घेऊन त्यासाठी स्वतंत्र ‘सोक पिट’ यंत्रणा, पर्यटनाला चालना मिळावी त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय टुरिस्ट हबची निर्मिती करणार असून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कला -संस्कृतीचे प्रदर्शन होणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा हे वैशिष्ट्ये असणार आहे. झोपडपट्टीवासीयांसह पूरग्रस्त, ओटा स्कीममधील नागरिकांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत नियोजन. पर्यावरण पूरक विकासाचे प्रकल्प अशी सर्वसमावेशक ‘विकासाची दशसूत्री’ मुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावणार असल्याचा ठाम विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे.