पुणे; शिवाजीनगर – चंद्रय्या मारय्या भंडारी (सी.एम.बी.) सामाजिक व शैक्षणिक संस्था गेल्या दहा वर्षापासून पुणे शहर व परिसरात कार्यरत असून संस्थेच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन २६ जानेवारी २०२५, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचा देखील विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह व पुष्प गुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते. सोबतच पोलीस, आरोग्य, कृषी, सामाजिक आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा देखील सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक कार्याचा वारसा भंडारी परिवाराची तिसरी पिढी भक्कमपणे सांभाळत असून संस्थेचे संस्थापक श्री एकनाथशेठ भंडारी, अध्यक्ष मारुती भंडारी, विश्वस्त अनिल भंडारी यांच्या सह सर्व कार्यकारणी व सदस्यांचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त सायंकाळच्या वेळी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करून व्यवसायिक मार्गदर्शक श्री एस. एस. सावंत यांनी महिलांना आर्थिदृष्ट्या सक्षम होण्याचे विशेष मार्गदर्शन केले. सोबतच महिलांचा आवडतीचा खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील मोठया जल्लोषात घेण्यात आला. या सत्राचे उद्घाटन सर्व स्त्रीशक्तीच्या हस्ते करण्यात आले होते. प्रसंगी माजी नगरसेविका रेश्मा भोसले व सामाजिक कार्यकर्त्या सायली पवार यांना देखील शीवंम्मा भंडारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लकी ड्रॉ च्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे तर खेळात सहभाग घेणाऱ्या सर्वांनाच भेटवस्तूचे वाटप देखील करण्यात आले. या बहारदार सोहळ्यासाठी हजारो महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.