
पुणे : शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर होणारा पुष्पवर्षाव…पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक… रॉयल एनफिल्ड वर स्वार होऊन बाईकर्सने शिवरायांना दिलेली मानवंदना…शिव शंकराचा तू अवतार हाती घेउनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार ही आरती म्हणत महिलांनी शेकडो दिव्यांनी केलेली शिवरायांची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शेकडो पुणेकरांच्या उपस्थित शिव स्वराज्य यात्रेचा समारोप आणि शिव पूजन सोहळा रंगला.
आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि भारतातील १३ राज्यातून सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. यावेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, आजचा कार्यक्रम हा भारत देशासाठी हा एक सुवर्णक्षण आहे. संपूर्ण जगासाठी एक स्वातंत्र्यदेवता म्हणून शिवाजी महाराज यांचे महत्त्व आहे. आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी हा युगपुरुष प्रेरणादायी आहे. जगभरात त्यांचे स्मारक निर्माण झाले पाहिजे. सामर्थ्य हे दीनदुबळ्यांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी असले पाहिजे हे शिवरायांनी सांगितले. जगाला आदर्शवादाकडे नेणारे शिवराय आवश्यक आहेत.
प्रदीप रावत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर ते राष्ट्रपुरुष आहेत. छत्रपती महाराज झाले नसते तर ज्ञानोबा माऊली पासून तुकाराम महाराज पर्यंत संतांनी निर्माण केलेला सहिष्णू परंपरा असलेला समाज नष्ट झाला असता. वारकरी जगायचे असतील तर महाराजांसारखे धारकरी उभे रहावे लागतात. शांतता हवी पण स्मशान शांतता नको या दोन गोष्टीला फरक महाराजांनी दाखवला, हा इतिहासाचा दाखला संपूर्ण जगासाठी कायम आदर्श ठरणार आहे.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, एक सुंदर, कृतिशील आणि दिशादर्शक असा हा उपक्रम आहे. जगातले महान राजा शिवाजी महाराज आहेत त्यांची तुलना करण्यासारखे कोणीही नाही. जगाला मार्ग दाखविणारे आदर्श म्हणजे शिवाजी महाराज, असेही त्यांनी सांगितले.हेमंत जाधव म्हणाले, सन २०२३ साली कुपवाडा येथे सैनिकांना स्फूर्ती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले. अशाच प्रकारचे लोक वर्गणीतून साकार झालेले जागतिक स्मारक टोकियो शहरात होत आहे.
कार्यक्रमात जपान मधील इडीगोवा इंडियन कल्चरल सेंटरचे विश्वस्त योगेंद्र पुराणिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मनोगत व्यक्त केले. याशिवाय शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांनी शिवकालीन युद्ध कला सादरीकरण, राम देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटन केले. भक्ती गुरुकुल भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले.
केशव शंखनाद पथकाने शंखवादन केले तर आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संतोष रासकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम मांढरे यांनी आभार मानले.