
पुणे : पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारी बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता- एक गेम चेंजर’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत हॉटेल शेरेटन ग्रँड, पुणे येथे ही परिषद होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील ३५० बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेमध्ये असणार आहे, अशी माहिती पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला संचालक विजय ढेरे, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे उपस्थित राहणार आहेत. परिषदेत पहिल्या सत्रात आयटी सल्लागार मिलिंद आंबेकर, संगणक तज्ञ श्वेता ढमाळ, कॉसमॉस बँकेचे जतीन सातपुते, रुबीस्केपचे संस्थापक डॉ. प्रशांत पानसरे, टीजेएसबी बँकेचे उपसरव्यवस्थापक हरप्रीत छाब्रा हे सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन या विषयावर बोलणार आहेत.
तर दुस-या सत्रात ‘सायबर सुरक्षेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर पुणे पीपल्स बँकेचे कैलास पवार, कॉसमॉस बँकेच्या आरती ढोले, बीएफएसआय च्या संचालिका अनिता श्रेयकर, विश्वगुरू इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गांगर्डे, सायबरतज्ञ अॅड. आशिष सोनवणे यांचे सादरीकरण होणार आहे. ‘सहकारी बँकांमध्ये नातेसंबंध व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर भारतीय रिझर्व बँकेचे डॉ. अजित कुमार मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेच्या तिस-या सत्रात ‘नफा वाढीसाठी क्षमता विकास’ या विषयावर बिग कॅथलिस्टचे विक्रांत पोंक्षे, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर मार्गदर्शन करणार आहेत.

अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता हे बँकिंग क्षेत्रासाठी परिवर्तनकारी तंत्रज्ञान ठरत आहे. सुरक्षित व्यवहार, वैयक्तिक सेवा आणि कार्यक्षम बँकिंग यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक आहे. डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि सायबर सुरक्षा यांचा समतोल राखून बँकांनी व्यवसाय वाढवण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर, सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षेतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नफा वाढीसाठी क्षमता विकास या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी असोसिएशनने या परिषदेत विशेष सत्रांचे आयोजन केले आहे. ही परिषद सहकारी बँकांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक सक्षम आणि सुरक्षित बनण्यास मदत करेल.
सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, अकोला, जळगाव, अहमदनगर , धुळे, बीड, नाशिक, रत्नागिरी, महाड, रायगड, संभाजी नगर, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नागपूर या भागातून बँकांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत.