एसटीचे पुणे विभागीय कार्यालय बनले दारूड्यांचे आगार
परिसरातच हाय-फाय दारूच्या बाटल्यांचा खच

पुणे :एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरातच हाय-फाय ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. त्यामुळे एसटीचे हे विभागीय सरकारी कार्यालय दारूड्यांचे आगारच बनले आहे की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, येथे झालेल्या या हाय-फाय दारूच्या पार्ट्या येथीलच अधिकार्यांच्या होत्या की काय? असा येथील चित्र पाहून प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिवस-रात्र आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे एसटी कर्मचार्यांना साधा पगार सुध्दा मिळालेला नाही. परिणामी, आधीच कमी पगार आणि त्यातच पगार मिळत नसल्यामुळे त्यांना घरसंसार कसा चालवायचा? एकवेळचे अन्न मिळविण्याची भ्रांत सुरू आहे.
मात्र, दुसरीकडे एसटीच्या पुणे विभागीय कार्यालय परिसरात चक्क दारूच्या पार्ट्या सुरू चित्र समोर येत आहे. या दारूच्या पार्ट्या साध्या सुध्या दारूच्या ब्रँडच्या नसून, चक्क हाय-फाय ब्रँडच्या असल्याचे समोर आले आहे. कारण येथे पडलेल्या दारूच्या बाटल्या महागड्या असून, त्या पिणे कर्मचार्यांना परवडणारे नाही. तसेच, बाहेरून कोणी आत आणून टाकल्या का? तर तसेही शक्य नाही. कारण, एसटीच्या या कार्यालयाला 24 तास ‘सुरम सुरक्षा’ची सिक्युरिटी तैनात असते. मग या बाटल्या कोणाच्या? हे सरकारी कार्यालय आहे की, दारूड्यांचा अड्डा? असा सवाल आता उपस्थित होत आहे.