तिचा जन्म वांद्रे, मुंबई येथे झाला. वडील प्रा. रमाकांत सिनारी हे स्वातंत्र्यसेनानी होते. गोव्याला पोर्तुगिजांच्या तावडीतून सोडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे देशसेवेचे बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळाले. मोठेपणी देशाची सेवा करण्याचं स्वप्नं ती मनी बाळगून होती. लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार. त्यामुळे साहजिकच डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची संधी तिला मिळाली. तिने डॉक्टर होण्याचा मार्ग निवडला. मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, तिची भेट सैन्यात डॉक्टर असलेल्या एका अधिकाऱ्याशी झाली. दोघांच्या भेटी वाढल्या. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करून विवाह केला. लग्न झाले तेव्हा ती १९ वर्षांची होती.लग्नाच्या वेळी तिचे पती मेजर डॉ. दिपक हे मार्शल आर्ट शिकत होते. “आपल्या पत्नीने सैन्यात कमांडो व्हावे.” ही त्यांची इच्छा.
कमांडो होण्यासाठी मार्शल आर्ट आवश्यक असल्यामुळे, त्यांनी तिला मार्शल आर्ट शिकविला. ते तिच्याकडून दिवसभर सराव करून घ्यायचे. तीही सैन्यात भरती व्हायचे, देशसेवा करण्याचे स्वप्नं पूर्ण करायचे म्हणून कठोर मेहनत करायची. तिची कठोर मेहनत पाहून, मैदानावर सरावासाठी येणारे सैनिक आणि सैन्य अधिकारी देखील अवाक् व्हायचे. तिच्या मेहनतीचे त्यांना कौतुक वाटायचे. यामुळे तिलासुद्धा अधिक स्फुरण चढायचे. या कठोर मेहनतीचे फळ तिला मिळाले. ती सैन्यात भरती झाली नाही, परंतु कमांडोंना प्रशिक्षण देण्याची संधी तिच्याकडे चालून आली. उभयंतांनी या संधीचं सोनं करायचं ठरविलं आणि सैन्याला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. तेही मोफत. गेली २० वर्षे ती जवानांना मोफत प्रशिक्षण देण्याचे आव्हानात्मक काम करते आहे. ती कणखर महिला म्हणजेच भारतातील पहिली आणि एकमेव महिला कमांडो ट्रेनर *डॉ. सीमा राव* होय. डॉ. सीमा यांना जवानांना प्रशिक्षण देताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. दररोज होणाऱ्या नव्या जखमांसह त्या प्रशिक्षणासाठी उभ्या राहत होत्या. या कामात त्यांनी स्वतःला इतकं झोकून दिलं की, आई होण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला देखील जाता आलं नाही.
जवानांना मोफत प्रशिक्षण देत असताना, त्यांची संपत्ती खर्च झाली होती. प्रसंगी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून, मिळालेल्या पैशातून कमांडोना प्रशिक्षण दिलं. दररोज नवनव्या संकटांना तोंड देत, मागील २० वर्षांपासून सीमा राव या इंडियन आर्मी, एअरफोर्स, नेव्हीसह पॅरामिलिट्री फोर्सच्या कमांडोंना ट्रेनिंग देत आहेत. आतापर्यंत त्यांनी २० हजार कमांडोंना प्रशिक्षित केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सीमा या कामाच्या बदल्यात भारतीय लष्कराकडून एक रुपयाही घेत नाहीत.त्यांनी मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्या जगातील अशा केवळ १० महिलांपैकी एक आहेत, ज्यांनी ‘जीत कुने दो’ हा मार्शल आर्टमधील अत्यंत अवघड असा प्रकार आत्मसात केला आहे. हा प्रकार ब्रुसलीनेही शिकला होता. त्या उत्तम शुटर असून ३० यार्डातील रेंजमध्ये एखाद्याच्या डोक्यावर ठेवलेलं सफरचंद भेदण्याइतपत अचूक निशाणा साधू शकतात.
एक स्त्री असून देखील शारीरिक क्षमता कमावत, आर्थिक, कौटुंबिक समस्यांवर मात करून हाती घेतलेले कार्य सुरूच ठेवले. त्यांनी चालवलेलं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. एक स्त्री असून देखील पुरुषी वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात स्वतःच्या यशाचा झेंडा रोवणाऱ्या डॉ. सीमा राव यांचा आदर्श प्रत्येक स्त्रीसाठी लाखमोलाचा आहे. जवानांना प्रशिक्षण देणाऱ्या, त्या देशातील पहिल्यावहिल्या महिला आहेत आणि म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.