आर्थिकविशेषव्यवसायीकसंपादकीय

पैशाने सर्वात श्रीमंत नसेल, परंतु विचारांनी भारतात सर्वात श्रीमंत असणारा व्यक्ती

तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेल्या लोकांनाही मोठ्या संघर्षातून जावे लागते.- रतन टाटा

_झालेल्या अपमानाचा बदला, बोलून घेण्यापेक्षा कृतीतून घेणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण घेण्यासाठी हॉटेलमध्ये भांडी घासणार्‍या, कारकुनी करणाऱ्या, भारतातील एका मोठ्या उद्योजक घराण्यातील व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास…..

२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईमधील एका पारशी आणि मोठ्या व्यावसायिक कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्यामुळेच अगदी बालपणापासूनच त्यांच्यावर व्यवसायाचे संस्कार झाले. जरी तो श्रीमंत घरात जन्माला आला असला, तरी त्याचं बालपण अतिशय खडतर होतं. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. तो एकटा पडला. त्याचा संपूर्ण सांभाळ त्याच्या आजीनेच केला.त्याचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले आणि पदवीच्या शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. तो स्वाभिमानी होता. त्याच्या आजोबांच्या नावाचा साऱ्या जगात दबदबा होता. पण तरीही त्याला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे होते. त्याला स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण करायचे होते. यासाठी त्याने कारकुनाची नोकरी केली, तर कधी हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम केले. येथेच तो एका तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडाला. त्या तरुणीने लग्नासाठी अमेरिकेतच राहण्याची अट ठेवली होती. परंतु लहानाचं मोठं करणाऱ्या आजीची तब्येत बिघडल्याने तो भारतात परत आला, तो परत गेलाच नाही. पर्यायाने त्याचा प्रेमभंग झाला. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतरचा हा दुसरा मोठा आघात त्याने सहन केला आणि आपल्‍या कुटुंबाच्‍या व्यवसायात स्वतःला झोकून दिले.

येथे त्याने सर्वसामान्य कामगाराप्रमाणे अनेक छोटी मोठी कामे केली. कारखान्यातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याला मोठी आव्हानं दिली गेली. त्याच्या ताब्यात एक नुकसानीत असलेली कंपनी सोपवण्यात आली. आपल्या परिसस्पर्शाने, परिश्रमाने आणि व्यावसायिक कौशल्याने तीन वर्षांतच ती कंपनी त्याने नफ्यात आणली. परंतु आणीबाणीने आणि कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे, पुढे ती कंपनी बंद करावी लागली. हे पहिले मोठं अपयश त्याच्या नावावर जमा झालं. अशीच दुसरी कंपनी ताब्यात दिली गेली. पण तिही संचालकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बंद करावी लागली. याचेही खापर त्याच्यावरच फोडण्यात आले. यामुळेच तो जबरदस्त दुखावला असला तरी; त्याची जिद्द, चिकाटी जरा देखील कमी झाली नव्हती. अनुभवाच्या शाळेत त्याने उत्तम शिक्षण घेतले होते. यामुळेच १९९१ साली त्या संपूर्ण समूहाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर देण्यात आली. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. अविश्वास दाखवला. पण त्याच्या अधिपत्याखाली कंपनीची यशस्वी घोडदौड सुरूच राहिली.

‘चांगल्या रस्त्याला गतिरोधक फार असतात’ असाच अनुभव त्याच्या वाट्याला आला. १९९८ साली त्याची एक कंपनी तोट्यात जाऊ लागली. सबब ती अमेरिकेतील फोर्ड कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या सीईओने त्याचा मोठा अपमान केला. हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याने तो व्यवहार रद्द केला आणि नव्या जोमाने, नव्या जोशाने कामाला लागला. काही वर्षांतच आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर तोट्यात चाललेल्या कंपनीला नावारूपास आणले. पुढे अवघ्या काही वर्षांत त्याच फोर्ड कंपनीच्या दोन जगप्रसिद्ध कंपन्या विकत घेऊन आपल्या अपमानाचा बदला घेतला. त्याने ‘बोलून उत्तर देण्यापेक्षा, कृतीने उत्तर दिले.’ आपल्या कृतीने उत्तर देणारा तो ‘उद्योग जगतातला संत’ म्हणजेच ‘मा. रतन टाटा’ होय.१९९१ साली रतन टाटा यांनी टाटा सन्सची धुरा सांभाळली. तेव्हापासून या उद्योगसमूहाने मागे वळून पाहिलेले नाही. आज टाटा समूहाच्या अंतर्गत ११o कंपन्या आहेत. टाटा समूहामध्ये चहापासून ते ५ स्टार हॉटेल्सपर्यंत, सुई पासून ते स्टीलपर्यंत, नॅनोकार पासून ते विमानापर्यंत सर्वकाही मिळते. उद्योगविस्ताराबरोबर नैतिकता जपण्याला टाटा समूह पहिले प्राधान्य देतो.

तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेल्या लोकांनाही मोठ्या संघर्षातून जावे लागते. रतन टाटा यांना देखील अनेक संकट आणि अपयश यांना सामोरे जावे लागले आहे. मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटांचा स्वभाव. आपल्याकडे धैर्य, चिकाटी, ध्येयासाठी लागेल तितके कष्ट करण्याची तयारी असेल, तर संकटं देखील पायाची दासी होईल आणि यश डोक्यावर मुकुट घालेल. रतन टाटा कदाचित पैशाने सर्वाधिक श्रीमंत नसतील, परंतु त्यांच्या विचारांनी ते भारत देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. रतन टाटा यांना २ooo सालामध्ये पद्मभूषण पुरस्कार व २oo८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!