केवळ मेट्रिक पास असलेला एक तरुण, स्वतःचे मोठे स्वप्नं घेऊन मुंबईमध्ये आला. तेव्हा त्याच्या खिशात केवळ हजार रुपयेच होते, परंतु काही वर्षांतच त्याने हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभं केलं. त्याला हे कसं शक्य झालं? इतका प्रचंड पैसा त्याने कसा कमावला? काय आहे त्याच्या यशाचं गुपित? कोण आहे तो यशवंत? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग…२८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील एका छोट्याशा खेड्यात एका शिक्षकाच्या घरात धीरजचा जन्म झाला. मिळणार्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे त्याच्या वडिलांना शक्य नव्हते. त्यामुळे अगदी बारा-तेरा वर्षे वयातच धीरजला घर चालवण्यासाठी कामधंदा करावा लागला.
कधी तेल, तर कधी भजी विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा.धीरज शिक्षणात फारसा हुशार नव्हता. त्यामुळे शिकण्यात त्याला फारसा रस नव्हता. शिकण्याऐवजी एखादा काम धंदा करण्यावर त्याचा विशेष भर असायचा. याच काळात धीरजने एक मोठा उद्योगपती होण्याचं स्वप्नं पाहिलं.१९४८ साली म्हणजेच मॅट्रिक पूर्ण झाल्यानंतर, वयाच्या अगदी सोळाव्या वर्षीच तो आपल्या भावाच्या मदतीने येमेन या देशात नोकरीसाठी गेला. तेथे त्याने पेट्रोल पंपावर ३०० रुपये पगारावर नोकरी पत्करली. नोकरी करतानासुद्धा तो शांत बसला नाही. याकाळात त्याने व्यवसायातील बारीक मोठे बारकावे शिकून घेतले. पेट्रोलपंपावर काम करतानाच त्याने काही बारीकसारीक कामे करायला सुरुवात केली.
शिवाय येमेनमधील गुजराती पेढ्यांसोबत काम करायला सुरुवात केली. कार्यकुशलतेच्या आणि योग्यतेच्या जोरावर तो मॅनेजर पदापर्यंत पोहोचला.१९५८ मध्ये धीरज भारतात परतला. पण खेडेगावात जाऊन प्रगती होणार नव्हती म्हणून परदेशात कमाविलेला पैसा घेऊन मुंबई गाठली. सुरुवातीला आपल्या एका चुलतभावाच्या सोबतीने काजू मिरे आणि रेयॉन कापड आयात निर्यात करणाऱ्या कंपनीची स्थापना केली, परंतु काही वर्षातच भागीदारी संपुष्टात आली. मग त्याने स्वतःच एका कापड कंपनीची सुरुवात केली. कंपनीचं पहिलं ऑफिस मस्जिद बंदरमध्ये ३५० चौ. फुटांचं होतं. एक टेलिफोन, एक टेबल आणि एक खुर्ची आणि खिशातले १००० रुपये एवढ्या गोष्टींवर कंपनीची सुरुवात झाली.अनेक अडचणी, समस्या आल्या. पण, धीरज डगमगला नाही. त्याने धैर्याने तोंड दिले आणि स्वतःचा नवा ब्रँड बाजारात आणला.
धीरजच्या कठोर परिश्रमाने व्यवसायाचा विस्तार वाढू लागला. आपल्या कंपनीचा आयपीओ बाजारात आणला. कंपनीची विजयी घोडदौड सुरूच राहिली. १९९९ साली धीरजला बिजनेस इंडिया-बिजनेस मॅन ऑफ द ईयर सन्मानाने गौरविण्यात आले आणि सन २००० साली तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. तो धीरज म्हणजेच भारतातील सर्वात मोठ्या रिलायन्स कंपनीचे संस्थापक धीरुभाई अंबानी होय.धीरूभाई यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकली, तर तीन महत्त्वपूर्ण बाबी लक्षात येतात. पहिली बाब कोणताही व्यवसाय छोटा अथवा मोठा नसतो. दुसरी बाब तुम्ही कितीही गरीब असा, परंतु तुमचा विचार श्रीमंत (मोठा) असायला हवा. तिसरी बाब, तुमची स्वप्नं मोठी असायला हवीत. ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून दिले पाहिजे.
धीरूभाई अत्यंत त्वरेने परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेत. जे करायचे ते लगेच करून मोकळे होत. इतर लोकांप्रमाणे मिटींग बोलावणे, जमाखर्च काढत बसणे, निष्कर्ष काढणे आदी गोष्टी त्यांच्या स्वभावात नव्हत्या. एवढ्या वेळेत जो लाभ घ्यायचा तो घेऊन ते सुरुवात करून टाकीत. विचार आणि त्याचा अंमल या दोन्हीत धीरूभाई फार कमी अंतर ठेवीत त्यामुळे ते वेगाने प्रगती करू शकले.
धीरूभाईंनी ज्यावेळी मुंबईत पाऊल टाकले होते, त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ हजार रुपये होते. आणि जेव्हा त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांची एकूण संपत्ती ६२ हजार कोटी रुपयांची होती. १९८६ मध्ये त्यांना उजव्या पायाला लकवा झाला होता, मात्र त्याचा काहीही परिणाम त्यांच्या इच्छाशक्तीवर झाला नव्हता. ते सातत्याने नवीन उद्योगाची स्वप्ने पाहत असत. आपल्या दृढसंकल्प आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवलं. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.