श्यामल कुलकर्णी करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेत कविता निकाळजे प्रथम
भूमिकेचा सर्वांगिण अभ्यास केल्यास व्यक्तिरेखेत माणूसपण आणणे शक्य : ज्योती सुभाष
पुणे : एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ केवळ महिलांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्यामल करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेत कविता निकाळजे (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांना श्यामल करंडक आणि पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
सीमा मोघे (पुणे) आणि स्नेहा धडवई (सातारा) यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. सेजल काळे (भीमाशंकर, घोडेगाव) आणि वंदना बंदावणे (संगमनेर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये व स्मृतीचिन्ह, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देण्यात आली.
राज्यस्तरीय श्यामल करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष असून स्पर्धेत 40 महिलांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरी दि. 12 व 13 फेब्रुवारी रोजी तर अंतिम फेरी रविवारी (दि. 20 फेब्रुवारी) झाली. अंतिम फेरीसाठी 12 महिलांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीनंतर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अंतिम फेरीचे परिक्षण ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका विनिता पिंपळखरे, अभिनेत्री माधवी सोमण, एकपात्री कलाकार दिलीप हल्याळ यांनी केले. पारितोषिक वितरणप्रसंगी एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्रचे अध्यक्ष दीपक रेगे, निळू फुले कला अकादमीचे विश्वस्त सुरेश देशमुख आणि श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संसारी महिला स्वत:ची आवड जोपासण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून जी धडपड दाखवित आहेत ती अभिनंदनीय आहे, असे आवर्जून नमूद करून ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष म्हणाल्या, नाटक-चित्रपट-मालिकेतील पात्र उभे करीत असताना केवळ पाठांतर करून उपयोग नाही तर आपण करीत असलेल्या भूमिकेचा, पात्राचा सर्वांगिण अभ्यास होणे गरजेचे आहे. त्या पात्राचा स्वभाव कसा असेल, त्याच्या मनात काय चालले असेल ते समजून घेतले तर ती केवळ भूमिका न राहता त्यात माणूसपण आणणे शक्य होते.
परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना विनिता पिंपळखरे म्हणाल्या, एकपात्री करण्यासाठी कलाकारामध्ये खूप मोठी पात्रता लागते. एकपात्री आणि कथाकथन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्ताने उत्तम दर्जाचा अभिनय पहायला मिळाला. लेखकाला काय म्हणायचे आहे हे कलाकाराला अभिनयातून दाखविता आले पाहिजे, असे झाले तरच संहितेचे चीज होईल.श्यामल कुलकर्णी यांचे पती अशोक आणि मुलगा अमोल कुलकर्णी हे सध्या अमेरिकेत स्थायिक असून यांचे मनोगत या वेळी ऐकविण्यात आले. श्यामल यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते, जीवनाकडे सकारात्मकपणे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन होता, असे अशोक कुलकर्णी यांनी सांगितले.
अनुजा कोल्हटकर म्हणाल्या, प्रत्येक महिलेला आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात. आई उत्तम कलाकार होती, तिच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिलीप हल्याळ यांनी श्यामल कुलकर्णी यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता भगत यांनी केले तर आभार सुरेश देशमुख यांनी मानले. प्राथमिक फेरीच्या परिक्षक दिपाली निरगुडकर आणि कल्पना देशपांडे उपस्थित होत्या.