रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे डॉ. चारुदत्त जाधव, विनोद जाधव, डॉ. आदित्य केळकर यांना व्होकेशनल अॅन्ड एक्सलन्स अॅवॉर्ड प्रदान
पर्यावरण, आरोग्य, डिजिटलायझेशन क्षेत्रात नव्या पिढीला संधी: किशोर पाटील
पुणे : शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आयुष्यात केवळ पैसा कमाविणे हा उद्देश न ठेवता समाजासाठी योगदान देणे आवश्यक आहे. पर्यावरणाबाबत युवा पिढी जागरूक असून पर्यावरण रक्षण, आरोग्य सेवा आणि डिजिटलायझेशन या क्षेत्रात नव्या पिढीला अनेक संधी उपलब्ध आहेत. ही पिढी या क्षेत्रात नक्कीच योगदान देईल, असा विश्वास केपीआयटीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ किशोर पाटील यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे प्रमुख पाहुणे किशोर पाटील आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे यांच्या हस्ते व्होकेशनल अॅन्ड सर्व्हिस एक्सलन्स अॅवॉर्डस् प्रदान करण्यात आली. त्या वेळी पाटील बोलत होते. टीसीएसमधील असेम्ब्ली सेंटरचे प्रमुख चारुदत्त जाधव, सावा ग्रुपचे चेअरमन विनोद जाधव, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, पुणेरी पगडी आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसिद्ध बुद्धिबळ पटू चंद्रशेखर गोखले, रोटरी हेरिटेजच्या सेक्रटरी हर्षदा बावनकर व्यासपीठावर होते. रॉयल कॅनॉट, बोटक्लब येथे हा सोहळा झाला.
किशोर पाटील म्हणाले, पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून त्यांचा सन्मान माझ्या हस्ते होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. रोटरी क्लबतर्फे जागतिक पातळीवर राबविल्या जात असलेल्या उपक्रमांमुळे मी प्रभावित झालो आहे. भविष्यातील उपक्रमांबद्दल जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यात सर्व क्षेत्रातील घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशातील उद्योजक मोलाची भूमिका बजावित आहेत.
विनोद जाधव म्हणाले, शालेय शिक्षण घेत असताना ग्रामीण जीवन, तेथील अर्थव्यवस्था याची माहिती मिळत गेली. लहान वयात नोकरीला सुरुवात केली त्याचबरोबर मिळेल ती कामे करीत गेलो. माझ्या आयुष्यात मिळत गेलेले अनुभव हीच माझी पदवी होती. आयुष्यात प्रत्येकाला शिक्षण आणि आरोग्य याची गरज असते; त्यामुळे मी या दोन क्षेत्रात कार्य करण्याचे निश्चित केले. रोटरीने आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करून रोटरीशी असलेले नाते अबाधित राहो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. चारुदत्त जाधव म्हणाले, आयुष्यात कुठल्याही गोष्टीत, मूल्यांमध्ये तडजोड केली नाही आणि दृष्टीकोनही बदलला नाही. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची झालेली भेट यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. लहानपणी अंधत्व आल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अंधत्व आलेले असताना डोळस व्यक्तींबरोबर बुद्धिबळ स्पर्धा खेळलो त्यात मिळालेल्या यशामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली यातूनच आपण आयुष्यात काहीही करू शकतो असा आत्मविश्वास मिळाला.
रोटरी क्लबतर्फे ग्रामीण भागात बुद्धिबळ खेळासंदर्भात काही उपक्रम राबविणार असल्यात त्यास सर्व तोपरी सहकार्य करू अशी ग्वाही चंद्रशेखर गोखले यांनी दिली.
डॉ. आदित्य केळकर यांनी त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले.
सुरुवातीस रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे यांनी रोटरी तर्फे शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचा उद्देश कथन केला. पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा परिचय मधुमिता बर्वे, गरिमा भाब्रा आणि अविनाश ओगले यांनी तर किशोर पाटील यांचा परिचय संजय महाजन यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया पुराणिक आणि शुब्रो सेन यांनी केले. आभार स्वाती मुळे यांनी मानले.