एकेकाळी पत्नीच्या पगारावर सुरू होता संसार, आज आहे कोट्यावधींची उलाढाल
१९६३ साली भारताच्या राजधानीत दिल्लीत त्यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर तर आई गृहिणी. एका सुशिक्षित घराण्यात त्यांचा जन्म झाल्याने त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले गेले. अभ्यासात हुशार असल्याने, तो एक उत्तम नोकरी मिळवेल. अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण, त्याच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होतं.इकडे आई-वडील त्याला एक डॉक्टर किंवा इंजिनिअर बनविण्याचं स्वप्नं पाहत होते, तर तिकडे त्याने अगदी लहान वयातच एक मोठा व्यावसायिक बनण्याचं स्वप्नं पाहिलं होतं.
पण कोणता व्यवसाय करायचा? कुठं करायचा? कधी करायचा? यासारख्या अनेक प्रश्नाबाबत तो अनभिज्ञच होता.शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर तो नोकरी करण्यासाठी बाहेर पडला. तीन वर्षे नोकरी केली. पण व्यवसाय करायचा आत्मविश्वास त्याच्यात अजूनही आला नव्हता. तरीही नोकरी सोडली. MBA केलं आणि परत नोकरीच केली. नोकरी करताना महिन्याला ८ हजार रुपये मिळत होते. १९९०मध्ये दरमहा आठ हजार रुपये कमी नव्हते. लग्न केलं आणि वर्षभरातच पुन्हा नोकरी सोडली.
बायको कमावती होती. त्यामुळे घरखर्चाची चिंता मिटली.१९९० साली आपल्या मित्रांच्या सोबतीने दोन कंपन्यांची स्थापना केली आणि घरातील एका खोलीत काम सुरू केले. तीन वर्षे एकत्र काम केल्यानंतर, दोन्ही भागीदार १९९३ मध्ये वेगळे झाले. त्या कंपनीत त्याला कसलाही फायदा झाला नाही. या पडत्या काळात सुरुवातीला फार उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्याने अनेक संस्थांमध्ये जाऊन कोचिंग क्लासेस घेतले. यामधून महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते, त्यामधून तो स्वतःचा खर्च भागवायचा. स्वतःला एक व्यावसायिक म्हणून उभारण्यासाठी त्याने अनेक कष्ट केलेले होते, परंतु अजूनही पदरात यशाचे दान पडले नव्हते.
म्हणतात ना “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती” प्रयत्न करणार्याला कधीतरी यश मिळतंच. नेमकं त्याच्या बाबतीत असंच घडलं.१९९६ साल उजाडलं होतं. भारतात इंटरनेट जोर धरू लागलं होतं. अशातच दिल्लीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तो गेला. त्याठिकाणी त्याने एका स्टॉल ला भेट दिली. WWW या तीन अक्षरांनी त्याची उत्सुकता वाढविली. ते काय आहे हे त्याने जाणून घेतलं. त्याला भविष्य समजलं आणि त्याने एक इंटरनेट कंपनी स्थापन करण्याचा त्याने निर्णय घेतला. अथक परिश्रम करून त्याने कंपनी सुरु देखील केली.
आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर त्यांने त्या कंपनीचा लौकिक भारतभर पसरविला. ९०च्या दशकाच्या मध्यावर मंदीचा काळ सुरू झाला होता. लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. याच संधीचा फायदा घेऊन पुढे आलेली आणि भारतातील नावाजलेली कंपनी म्हणजेच ‘नोकरी डॉट कॉम’ होय आणि तिचे संस्थापक म्हणजेच संजीव बिखचंदानी होय. अनेकांच्या आयुष्यातील दोन्ही कठीण कामं म्हणजे चांगली नोकरी शोधणं आणि लग्नासाठी चांगला जोडीदार शोधणं. नोकरी डॉट कॉम (Naukari.com) आणि जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansathi.com) या दोन पोर्टलच्या आणि इन्फोएज कंपनीच्या माध्यमातून संजीव बिखचंदानी यांनी दोन्ही गोष्टी सोप्या केल्या आहेत. २००६मध्ये, नोकरी डॉट कॉम शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पहिली डॉट कॉम कंपनी बनली.
संजीव बिखचंदानी इन्फोएज इंडियाचे (Info Edge India) संस्थापक आहेत. नोकरी डॉट कॉम (Naukri.com), 99 एकर्स डॉट कॉम (99Acres.com) आणि शिक्षा डॉट कॉम (Shiksha.com) यासारख्या अनेक इंटरनेट-आधारित संस्था चालवतात. एवढेच नाही तर कंपनीने झोमॅटो, व्हेकेशन लॅब्स, उन्नती आणि पॉलिसी बाजार इत्यादी बर्याच मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. आज इन्फोएजचे मूल्यांकन ८५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर २.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, बिखचंदानी या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आहेत. संजीव यांच्या अथक परिश्रमातून नौकरी डॉट कॉम ही भारतातील पहिली इंटरनेट कंपनी ठरली आहे. जानेवारी २०२० मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.