१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
_एकोणीस वय म्हणजे मौजमजा करण्याचं वय. पण या मौजमजा करण्याच्या वयात एका तरुणाने स्वतःची कंपनी सुरू केली आणि आज त्या कंपनीची किंमत हजारों कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्या तरुणाला हे कसं शक्य झालं काय? कोण हा तरुण? काय त्याचा संघर्ष?
१६ नोव्हेंबर १९९३ रोजी उडीसा राज्यातील बिसम कटक गावातील एका सधन व्यावसायिक कुटुंबामध्ये रितेशचा जन्म झाला. वडील एक बांधकाम व्यावसायिक आणि गृहिणी. बारावीपर्यंतचे शिक्षण कटक मध्येच झाले. त्याने पुढील शिक्षक IIT मध्येच पूर्ण करावे ही घरच्यांची इच्छा. म्हणून तो राजस्थानमधील कोटा येथे आला.प्रवास त्याचा आवडीचा विषय होता. त्याने प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. घरची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने त्याला कशाची कमी नव्हती. पण आपण नोकरी करायची नाही, तर उद्योग करायचा या ध्येयाने एवढा पछाडला होता की सुरुवातीला अगदी छोटे-मोठे उद्योग त्याने सुरू केले. शिक्षण अर्धवट सोडून सुरुवातीचे काही दिवस मोबाईल सिमकार्ड विकण्याचाही व्यवसाय केला होता.
२००९ साली रितेश डेहराडून आणि मसूरी येथे फिरायला गेला होता. तिथं त्याला एक आयडिया सुचली. त्याने एक ऑनलाईन सोशल कम्युनिटी सुरु करण्याचा विचार केला. याठिकाणी प्रॉपर्टी मालक, सर्व्हिस प्रोव्हायडर यांना एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे ठरविले. त्याने २०११ मध्ये ओरावेल नावाची कंपनी सुरू केली. ज्याआधारे भारतातील कोणत्याही पर्यटकाला कोणतेही हॉटेल क्षणात बुक करता करण्याची सुविधा देण्यात येत होती. त्याची ही कल्पना पाहून काही गुंतवणूकदारांनी त्याच्या या व्यवसायात गुंतवणूक केली. शिवाय त्याच्या या कल्पनेला पीटर थील यांची थील फेलोशिप देखील मिळाली. खूपच कमी वेळामध्ये आपल्या स्टार्टअपला मिळालेल्या या यशामुळे रितेश खूपच उत्साहित झाला आणि त्याने आपल्या या स्टार्टअपवर अजून बारकाईने काम करण्यास सुरूवात केली. पण त्याचे हे बिझनेस मॉडेल यशस्वी होऊ शकले नाही. कंपनी तोट्यात जावू लागली आणि सरतेशेवटी त्याला ती बंद करावी लागली.
नुकसान झाले होते. अशाने एखाद्याचे मनोबल खचले असते. पण या घटनेने तो अधिकच प्रेरित झाला. त्याचा त्याच्या कल्पनेवर आणि स्वतःवर विश्वास होता. त्याने आपल्या अपयशाची कारणे शोधली. आपले प्रवासातील अनुभव आठविले. स्वतःच्या झालेल्या चुका शोधल्या. त्या सुधारून प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन त्याने एक नवी कंपनी स्थापन केली. लोकांना कमी किंमतीमध्ये सर्वोत्तम, चांगल्या आणि आरामदायी रूम मिळू लागल्या. अल्पावधीतच त्याचा स्टार्टअप लोकप्रिय झाला आणि तो अब्जाधीश झाला. ती लोकप्रिय कंपनी म्हणजे ओयो रूम्स आणि त्याचा संस्थापक म्हणजेच रितेश अग्रवाल होय.वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात करणारा रितेश वयाच्या सव्वीसाव्या वर्षी बिलिनियर होतो. रितेशचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२०ने रितेशला जगातील दुसर्या क्रमांकावरील सेल्फ मेड बिलिनियर म्हणून गौरविले आहे. आजच्या घडीला सुमारे १२ अब्ज डॉलर म्हणजे अंदाजे ९० हजार कोटी रुपये एवढे ओयो रूम्सचे बाजारमूल्य झाले आहे. फक्त पाच वर्षात या कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे.
माणसाच्या यशामध्ये विचारांचा वाटा मोठा असतो. एखादा विचार, एखादी कल्पना आपल्या मनात आली की, आपण त्यावर लगेचच काम केलं पाहिजे. अन्यथा आपले विचार, कल्पना इतरांच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात येतात. त्यावेळी आपल्याला पश्चाताप करत बसावे लागते. रितेश अग्रवालने आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले आणि आपली संपूर्ण ताकद या कल्पनेवर लावली. म्हणूनच तो २०२०च्या हारून ग्लोबल रिच लिस्टनुसार जगातील दुसर्या क्रमांकाचा अब्जाधीश आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे.