पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, देवदासी महिला यांसह सामान्य नागरिक अशा ९३६ जणांची मोफत तपासणी करण्यात आली.
जय गणेश प्रांगण, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर झालेल्या शिबीराच्या उद््घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य आरोग्य सहसंचालक डॉ. रामजी आडकेकर, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, राजेंद्र पायमोडे, गजाभाऊ धावडे यांसह पदाधिकारी व उपस्थित होते.
ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, पराग बंगाळे आणि सहका-यांनी शिबीरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. आरोग्य शिबीरात नू.म.वि. प्राथमिक शाळा, आदर्श विद्यालय प्राथमिक शाळा, गोपाळ हायस्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात शिबीर हा एक भाग आहे.
आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्ताच्या तपासण्या, दंत तपासणी, अस्थिरोग तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबीराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना माफक दरामध्ये एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली. जहांगिर हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल हडपसर, व्हिजन नेक्स्ट आय केअर हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल, आॅरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कात्रज, गॅलेक्सी आय केअर हॉस्पिटल कर्वे रस्ता, क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर, माधवबाग कार्डीयाक केअर क्लिनिक, नाना पालकर स्मृती चिकित्सालय यांनी शिबीरात सहभाग घेत सेवा दिली.
दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.