जाधवर इन्स्टिटयूटस् तर्फे ७ वा श्रीमद्् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव
प्रासंगिक दृश्यांसह संगीतमय भागवत कथा
पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे ७ वा श्रीमद्् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव न-हे येथील प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रासंगिक दृश्यांसह भव्यदिव्य संगीतमय कथा हे महोत्सवाचे वैशिष्टय असणार आहे. दिनांक १ ते ८ आॅगस्ट रोजी दररोज सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत या कथेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
श्री क्षेत्र शिऊर संत शिवाई संस्थेचे भागवताचार्य श्रद्धेय स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री (वृंदावन धाम) हे कथा सांगणार आहेत. मंगळवार, दिनांक १ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता भागवत ग्रंथाची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. सप्ताहात गणेश पूजन, नारद भक्ती संवाद, गोकर्ण आख्यान, शुकदेव आगमन, ध्रुवचरित्र, समुद्रमंथन, श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन, दहीहंडी, कंसवध, कृष्ण सुदामा संवाद, परिक्षीती उद्धार यांसह विविध कथा ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. कथेकरीता तबला साथ प्रशांत बोरडे, सागर बोरडे, बुलबुल तरंग पुरुषोत्तम वाघाडे, सिंथेसायझर साहेबराव कवडे आणि प्रासंगिक दृश्य सुरेश महाराज शास्त्री करणार आहेत.
दिनांक ८ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजता होम-हवन, सकाळी १० वाजता कीर्तन केसरी शिवशंभु व्याख्याते ह.भ.प. राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तर, कथा सांगता समारंभ विनायक बनसोड यांच्यातर्फे महाप्रसादाने दुपारी १२ ते २ यावेळेत होईल. प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा जाधवर, अंजली येप्रे, लक्ष्मीछाया हुले, शितल तळेकर, लता गांदले, शोभा पाटील, डॉ.महालक्ष्मी मोराळे, विजया जाधवर, सुरेखा गायकवाड, मंजुश्री हुले, ह.भ.प.येप्रे महाराज साधक वर्ग आणि समस्त न-हेगाव ग्रामस्थ यांनी आयोजन केले आहे.