शिक्षणाच्या माहेरघरात डिप्लोमा धारक विद्यार्थी इंग्रजी माध्यम शाळेचा ‘प्राचार्य’
पात्रता नसतानाही संस्थाचालकांचा मुलगा म्हणून नियुक्ती केल्याची धक्कादायक बाब
पुणे : कै. चंद्रकांत यशवंत दांगट (पाटील) शिक्षण मंडळ या संस्थेच्या रॉयल रोजेस इंग्लिश मिडीयम स्कूल, वडगाव बुद्रूक पुणे या शाळेच्या प्राचार्यपदी डिप्लोमा धारक विद्यार्थ्याची नेमणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संस्थाचालकांचा मुलगा असल्याने प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून आले असून सन २०२१ पासून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा कारभार पुण्यात सुरु आहे. प्राचार्यपदी संस्थाचालकांचा मुलगा चिरंजीव विकास दांगट हे कार्यरत आहेत. तर, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब दांगट पाटील, तर कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक विकास दांगट पाटील हे कामकाज पहात आहेत. प्रत्यक्षात राज्य शासनाच्या निर्णयानुसार डिप्लोमा हा इयत्ता १२ वी समकक्ष आहे.
याबाबत पुणे मनपा शिक्षण विभाग (प्राथमिक), शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. त्यांच्याकडून शाळेने खुलासा सादर करावा, अशी नोटीस देखील शाळेला देण्यात आली. मात्र, आजपर्यंत कोणतीही समाधानकारक व ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिषेक हरिदास, अभिजित खेडकर यांनी याबाबतचे तक्रार पत्र शिक्षण विभागाला दिले होते. शाळेच्या फेसबुक खात्यावरून तसेच स्कूल बस सेफ्टी या वेबसाईटवर, तसेच एस.एस.सी.बोर्डाच्या वेबसाईट वरील व इतर माहिती नुसार हे पुराव्यानिशी स्पष्ट होते की चिरंजीव विकास दांगट हे रॉयल रोझेस इंग्लिश मिडीयम स्कूल वडगाव बुद्रूक पुण्याचे प्राचार्य म्हणून आजही काम बघत आहेत.
डॉ.अभिषेक हरिदास म्हणाले, प्रत्यक्षात चिरंजीव विकास दांगट यांचे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग झाले असून त्यांना ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग आणि टेक्नॉलॉजी सातारा येथे द्वितीय वर्ष इंजिनियरिंग पदवी साठी अलोटमेन्ट झाली आहे. तसेच त्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य पदवी अभ्यासक्रम त्यांच्याच संस्थेच्या महाविद्यालयात सुरु आहे .चिरंजीव विकास दांगट यांचे शिक्षण हे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग झाले असून ते पुढील वाणिज्य या पदवीचे शिक्षण घेत आहेत. तसेच त्यांची पदवी देखील पूर्ण झाली नसतांनाही वडिलांच्या वशिल्यावर म्हणजेच कै.चंद्रकांत यशवंत दांगट (पाटील) शिक्षण मंडळ या संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक विकास दांगट पाटील व अध्यक्ष बाबासाहेब दांगट पाटील यांनी चिरंजीव विकास दांगट यांना शैक्षणिक पात्रता नसतानाही प्राचार्य पदी नियुक्ती केली. तसेच त्यांना आत्तापर्यंत पगारही दिला जात आहे.
शैक्षणिक पात्रता प्राचार्य पदा साठी वैध नसतांना संस्थाचालकांचा मुलगा म्हणून प्राचार्य पदी बसवून त्यांना पगार स्वरूपात आर्थिक लाभ देणाऱ्या तसेच अपात्रताधारक प्राचार्य नेमून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाऱ्या संस्थाचालकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. तसेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग पदवीका धारक चिरंजीव विकास दांगट पदास पात्र नसतांनाही प्राचार्य पद स्वीकारून शासनाची, जनतेची व विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याने त्यांच्यावर चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील डॉ. अभिषेक हरिदास केली आहे.