“महाराष्ट्र विद्या मंडळ’चा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात
आपल्याला घडविणाऱ्याबद्दल कृतज्ञता ठेवावी; प्रसुती तज्ज्ञ डॉ.राधा संगमनेरकर
पुणे : “आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेकांचे मार्गदर्शन, मदतीने आपण घडत असतो. त्यामुळे आपण कोण आहोत, यापेक्षा आपण कोणामुळे आहोत हे ओळखून ज्यांनी आपल्याला घडविले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवली पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रसुती तज्ज्ञ डॉ.राधा संगमनेरकर यांनी केले.
महाराष्ट्र विद्या मंडळ’च्या ६९ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या आनंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात संगमनेरकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, महाराष्ट्र विद्या मंडळचे अध्यक्ष दिलीप देशपांडे, विश्वस्त विवेक राठी, चिटणीस शिवानी डोंगरे, सहचिटणीस मंजुषा भार्गवे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.राधा संगमनेरकर पुढे बोलताना म्हणाल्या, ” योग्य वेळी मार्ग दाखविणारा गुरू मिळाला नाही तर, विद्यार्थी मार्ग चुकतात. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे क्षितीज अधिकाधिक विस्तारण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांची असते.पाठ्यपुस्तका बरोबरच आयुष्यातील नैतिक विचारांची शिदोरी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचे कार्य शिक्षक करत असतात. शिक्षकांमुळेच समाजात क्रांती घडते. विद्याज्ञान केल्याने ज्ञानात अधिक भर पडते ही भावना ठेवून शिक्षकांनी समाजात कार्यरत राहावे. विद्यार्थींना शाश्वत शिक्षण देण्याची भूमिका ठेवली तर देशाची प्रगती निश्चित आहे.अशी भावना संगमनेरकर यांनी व्यक्त केली.
दिलीप देशपांडे म्हणाले,” शिक्षक हे कायमच समाजासाठी आदर्श असतात. संस्थेच्या ६९ वर्षाच्या कालखंडात संस्थेच्या परिघातील विद्यार्थी समाजात नावलौकिक मिळवित आहेत याचा विशेष आनंद वाटतो.”
संस्थेच्या चिटणीस शिवानी डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याविषयीची माहिती दिली.जुई अहिवळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका मुक्ता पेंडसे यांनी केले. सहचिटणीस मंजुषा भार्गवे यांनी आभार मानले.