अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्रात ‘हर घर भगवा ध्वज’ अभियानविश्व हिंदू परिषद मंदिर आणि अर्चक पुरोहित संपर्क विभाग यांच्या वतीने आयोजन
गोविंददेवजी गिरी महाराज यांच्या हस्ते ध्वज पूजन
पुणे : अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्रात प्रत्येक घरावर भगवा ध्वज उभारून रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
रविवार, दिनांक ५ नोव्हेंबर पासून ‘हर घर भगवा ध्वज’ या अभियानाला सुरुवात होणार आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता शनिवार पेठेतील रमणबाग प्रशाला येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण तीर्थक्षेत्र न्यास अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंददेवजी गिरी महाराज यांच्या हस्ते ध्वज पूजन होणार आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतमंत्री संजय मुद्राळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, पश्चिम महाराष्ट्राचे मंदिर संपर्कप्रमुख मनोहर ओक, प्रमोद मिसाळ, बापूसाहेब पोकळे, संजय देखणे, मिलिंद ओतारी, तुषार कुलकर्णी उपस्थित होते.
मनोहर ओक म्हणाले, प्रभू श्रीराम हे राष्ट्र दैवत आहे आणि राष्ट्रनिर्माणाचे प्रमुख स्त्रोत आहेत. त्यांच्याप्रती असणाऱ्या कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेने प्राचीन काळापासून देश जोडण्याचे कार्य झाले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकाने या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर भगवा ध्वज फडकवावा.
देणगी मूल्य ५० रुपयांत ध्वज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मंदिर संपर्क विभागातर्फे करून देण्यात येत आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एक जानेवारीपासूनच आपल्या घरावर भगवा ध्वज लावावा, असे आवाहन यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले.