आर्थिकदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रव्यवसायीक

इंडिया-लॅटिन अमेरिका व कॅरेबियन कंट्री बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे शनिवारी (दि. २) आयोजन

ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिनासह बारा देशांचे उच्चपदस्थ अधिकारी होणार सहभागी

पुणे : ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या (जीआयबीएफ) वतीने ‘इंडिया-लॅटिन अमेरिका व कॅरेबियन कंट्री बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे येत्या शनिवारी (दि. २ मार्च २०२४) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे आयोजन केले आहे, अशी माहिती ‘जीआयबीएफ’चे संस्थापक व ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘जीआयबीएफ’च्या सेक्रेटरी जनरल दीपाली गडकरी, ग्लोबल स्टार्टअप संचालक अभिषेक जोशी, मार्केटिंग हेड वैशाली बदले, सल्लागार संजय देशपांडे आदी उपस्थित होते.

डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, भारत व अन्य देशांतील परस्पर व्यापारी संबंधांना सक्षम करण्यासाठी, तसेच जागतिक स्तरावर भारतीय उद्योजकांना असलेल्या संधी यांविषयी विचारमंथन करण्यासाठी ही परिषद महत्वाची आहे. दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिना, पेरू, चिली, कोस्टारिका, गयाना, उरुग्वे,क्युबा, त्रिनिदाद अँड टोबॅगो, व्हेनेझुएला, एल साल्वाडोर या १२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व डिप्लोमॅट्स यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी होणार आहेत.”

“त्रिनिदाद अँड टोबॅगोचे उच्चायुक्त रॉजर गोपॉल, क्युबाचे व्यवहार प्रमुख अबेल अबल्ले डिस्पेगन, चिलीचे राजदूत जुआन अंगुलो, उरुग्वेचे राजदूत अल्बर्टो गुआनी, कोस्टारिकाच्या व्यवहार प्रमुख सोफिया सालस, एल साल्वाडोरचे राजदूत गुईलेर्मो रुबिओ फ्युन्स, इकॉनॉमिक काऊन्सलर स्टीवन रेमिरेज, ब्राझीलचे व्यापार अधिकारी गोपाल सिंग राजपूत, व्हेनेझुएलाच्या राजदूत कपाया रॉड्रिग्ज गोंजालेज, मिनिस्टर काऊन्सिलर रोजर सेयेद्दी, मेक्सिकोचे इकॉनॉमिक्स अँड ट्रेड प्रमोशन प्रमुख डॅनियल डेल्गडो, गयानाचे सचिव केशव तिवारी, पेरूचे ट्रेंड अँड टुरिझम कौन्सलर लुईस मिगुएल काबेलो आदी पदाधिकारी या परिषदेत आपापल्या देशातील व्यापाराच्या व व्यावसायिक गुंतवणुकीच्या संधीवर सादरीकरण करणार आहेत,” असे डॉ. जितेंद्र जोशी यांनी नमूद केले.

डॉ. जितेंद्र जोशी पुढे म्हणाले, “बिझनेस टू बिझनेस मिटिंग व प्रश्नोत्तरे होणार आहेत. शिक्षण, उत्पादन, कृषी, अन्न प्रक्रिया, ऊर्जा (तेल व गॅस), अक्षय ऊर्जा, बांधकाम व पायाभूत सुविधा, माहिती व संपर्क तंत्रज्ञान, औषधनिर्माण, ट्रॅव्हल अँड टुरिझम, खनिकर्म यासह इतर अनेक क्षेत्रातील उद्योजक सहभागी होणार आहेत. आत्मनिर्भर भारत आणि वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आमचा विश्वास असून, त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. चर्चासत्रे, वेबिनार्स, सत्कार समारंभ आयोजित करत असतो. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) समोर ठेवून परस्परांतील व्यापारवृद्धी, रोजगारनिर्मिती यावर भर देत परंपरागत नोकरीची मानसिकता दूर करण्याला प्राधान्य देत आहोत.

“लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांत भारतीय उद्योजकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. त्यामुळे अधिकाधिक उद्योजकांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन दीपाली गडकरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!