पुणे शहर पोलिसांची मुंबई २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांना मानवंदना
पुणे : जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी… या भावना व्यक्त करीत मुंबईमधील २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला.
पोलिसांसह ६ हजार शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम विभागचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल, पोलीस उपायुक्त आर. राजा, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष पराग शिंदे,अमर लांडे, उमेश कांबळे, सचिन ससाणे, विक्रांत मोहिते, राजाभाऊ महाडिक, भूमी पंडित, वैष्णवी सासणे उपस्थित होते.
यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले. चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण गिरीश चरवड, संदीप गायकवाड नितीन होले, समीर धर्माधिकारी, रुपेश पवार यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले.