पुणे : कराटे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या अल्टिमेट कराटे लीग (UKL) सिझन २.० मध्ये ‘पुणे डिव्हाईन’चा संघ ‘विनिंग किक’ मारून स्पर्धेचे विजेतेपद पटवण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती ‘पुणे डिव्हाईन’चे संघमालक विजय चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘युकेएल सीझन २.०’ यंदा उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथील बाबू बनारसी दास बॅडमिंटन अकादमीमध्ये ३ ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत होत आहे.
‘पुणे डिव्हाईन’च्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी डेक्कन जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमावेळी चव्हाण बोलत होते. प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत थोपटे, उद्योजक कुंडलिक जाधव, गुरुवर्य गजानन बापूजी, ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर, विनोदी कलाकार रोहित प्यारे, रिटाजी आदी उपस्थित होते. पूनम सरोदे यांनी सूत्रसंचालन केले.
‘युकेएल’मध्ये एकूण सहा फ्रँचायझी-आधारित संघ सहभागी होणार आहेत. ‘पुणे डिव्हाईन’सह यूपी रेबल्स, दिल्ली ब्रेव्हहार्ट्स, मुंबई निंजा, पंजाब फाइटर्स, बेंगळुरू किंग्स या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघात एक वर्ल्ड चॅम्पियन आणि एक युरोपियन चॅम्पियन मार्की खेळाडू असेल. पाच पुरुष आणि एक महिला खेळाडू असा संघ आहे. सर्व सामने जगभरातील अनेक प्लॅटफॉर्मवर दररोज संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दोन तास प्रसारित केले जातील.
बॉक्सिंग, कुस्ती इत्यादी जगातील सर्व लढाऊ खेळांमध्ये केवळ वैयक्तिक सामने असतात. परंतु ‘यूकेएल’ हा एक अद्वितीय सामना होणार आहे. ज्याने वैयक्तिक खेळाचे सांघिक खेळात रूपांतर केले आहे. येथे एका खेळाडूला एकाच वेळी तीन विरोधकांचा सामना करावा लागतो. मॅचचे तीन सेट ४५ मिनिटांत पूर्ण होतात, ज्यात स्लो-मोशन आणि व्यावसायिक ब्रेक असतात. केवळ नॉकडाउन तंत्र स्कोअरची नोंदणी करते. सामना ड्रॉ झाल्यास महिला वैयक्तिक सामना अंतिम निकाल ठरवतो, असे विजय चव्हाण यांनी नमूद केले.
पुण्यात कराटे अकॅडमी सुरु करणार
महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी, तसेच युवांमध्ये खेळभावना रुजावी, आरोग्य चांगले राहावे, यासह आगामी कराटे लीगमध्ये पुण्यातील खेळाडूंचा सहभाग वाढावा, यासाठी पुण्यात लवकरच कराटे अकॅडमी सुरु करणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.