पुणे : “ग्राहकांना उत्तम सेवा देऊ पाहणाऱ्या जवळपास १८० महिला उद्योजिकांचे वैविध्यपूर्ण स्टॉल पाहिले. दर्जेदार वस्तू आणि व्यवसायाचा दुर्दम्य विश्वास या महिलांच्या चेहऱ्यावर दिसला. छोटे व महिला व्यावसायिक, घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणी अशा सगळ्यांना प्रोत्साहन व पाठबळ देण्याचा प्रयत्न ‘घे भरारी’ प्रदर्शनातून होत आहे. त्यामुळेच कोरोनाच्या संकटानंतर अनेकजणी सक्षमपणे आपला व्यवसाय विस्तारत आहेत, याचा आनंद वाटतो,” असे मत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
छोट्या व महिला व्यावसायिकांच्या ‘घे भरारी’ या फेसबुक ग्रुपतर्फे २८ एप्रिल ते १ मे २०२२ या कालावधीत आयोजित चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्समध्ये १ मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. यावेळी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे, संयोजक नीलम उमराणी-एदलाबादकर व राहुल कुलकर्णी, नेहा खरे, राधा सुखडीया, जाई कौशिक, अश्विनी कदम आदी उपस्थित होते.
‘रणांगण’ या मावळा गेम प्रस्तुत विशेष उपक्रमाचे सादरीकरण या प्रदर्शनात होणार असून, एकाचवेळी १०० मुलांना हा खेळ खेळता येणार आहे.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “केंद्र सरकार देखील महिलांच्या उद्योगांना प्राधान्य देत असून, त्यासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. ‘घे भरारी’ सारख्या प्रदर्शनातून अशा योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. या प्रदर्शनाची व्याप्ती वाढत आहेत. दीड हजारपेक्षा जास्त उद्योजिका आणि लाखो ग्राहक जोडण्याचे काम या घे भरारी ग्रुपने केले आहे. यातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे. साड्या, दागिने यासह विविध कलाकुसरीच्या व पर्यावरणपूरक वस्तू बनवत महिला स्वतःला व्यवसायिकतेकडे घेऊन जात आहेत.”
अनिकेत आमटे म्हणाले, “महिला सक्षमीकरणाचा हा एक उत्तम प्रयोग आहे. त्यांच्यातील व्यावसायिकता विकसित होण्यास अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतील. मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेकीना उभारी दिली आहे. सामाजिक संस्थांना जोडण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असून, त्यातून समाजाप्रती बांधिलकी जपण्याचे काम ‘घे भरारी’ करत आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारची प्रदर्शने भरावीत. नागपूरला प्रदर्शन झाले, तर आम्हीही त्यात मदत करू.”
नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे १८० स्टॉल येथे आहेत. विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि मनोरंजन होईल. महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड डिझायनर ड्रेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, गिफ्ट आर्टिकल, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या, लहानांसाठी खेळणी असे वैविध्यपूर्ण स्टॉल येथे आहेत.’घे भरारी’च्या माध्यमातून महिलांना, स्टार्टअपना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. जवळपास ८० टक्के महिलांचा सहभाग या प्रदर्शनात असून, इतर तरुण मुलांचे स्टार्टअप यात आहेत. प्रदर्शनातून महिला व्यावसायिकांना अनेक ग्राहकांना जोडता येते. सामाजिक संस्थांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा यांचाही स्टॉल येथे आहे, असे राहुल कुलकर्णी यांनी नमूद केले.