पुणेमहाराष्ट्रसामाजिक

पारधी समाजातील मुला-मुलींच्या पंखांना अ‍ॅमनोरा फाऊंडेशनने दिले बळ

महाराष्ट्रातील गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींकरिता रुलर स्कॉलर स्किम व यशस्वी विद्यार्थीनींचा गौरव

पुणे : महाराष्ट्राच्या नकाशावरील खामगाव जवळील अतिशय छोटेसे खेडेगाव असलेल्या दुर्गम भागातील शाळेत पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या सावलीत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या, याकरिता पुण्यातील अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. पारधी समाजातील मुला-मुलींना सर्वतोपरी मदत आणि रुलर स्कॉलर स्किम अंतर्गत महाराष्ट्रातील गरजू महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा शैक्षणिक खर्च असा मदतीचा हात देत या विद्यार्थ्यांच्या पंखांना फाऊंडेशनचे बळ दिले आहे.

अशाच यशस्वी गरजू विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सन्मान सोहळा पुण्यात नुकताच पार पडला. अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशनतर्फे हडपसर मगरपट्टा जवळील अ‍ॅमेनोरा द फर्न येथे या विद्यार्थ्यांच्या सन्मानसोहळ्याचे व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, विवेक कुलकर्णी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

फाऊंडेशनच्या कार्याला हातभार लावणा-या नोबेल हॉस्पिटलचे डॉ.एस.के.राऊत, लोकमान्य हॉस्पिटलचे विशाल क्षीरसागर, आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे डॉ.शेखर कुलकर्णी, सरिता सोनवले, रोटरी क्लब कात्रजचे मिलिंद कुलकर्णी, नितीन नाईक, डॉ.अजित कुलकर्णी, डॉ.एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमधील पदाधिका-यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच खामगाव येथील पारधी समाजातील विद्यार्थी संतोष अंबुरे, ॠषिकेश सोनवणे आणि कराटे खेळाडू अथर्व चव्हाण यांना देखील गौरविण्यात आले.

रुलर स्कॉलर स्किम अंतर्गत प्रियांका मोहिते, अश्विनी लेम्भे, क्षितिजा धुमाळ या महाराष्ट्रातील गरजू व यशस्वी विद्यार्थीनींचे सन्मानचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले. जलसंधारणाविषयी व पाणी बचतीविषयी मी अवंतिका ही चित्रफित आणि पारधी शाळेच्या कार्याची चित्रफित देखील यावेळी दाखविण्यात आली. यावेळी पारधी समाजातील शालेय विद्यार्थ्यांनी योगासने देखील सादर केली.

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, पारधी समाजातील मुलांचे आयुष्य बदलून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न फाऊंडेशन करीत आहे. केवळ शिक्षण नाही, तर कला, क्रीडा अशा विविध माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गरजू लोकांना अन्नदानसोबतच विद्यादानासारखी पोटाची खळगी कायमस्वरूपी भरणारी मदत आम्ही करीत आहोत.

पारधी समाज हा ब्रिटीशांच्या विरोधात लढणारा समाज अशी त्याकाळी ओळख असल्याने त्यांना सरकारी कागदपत्रांकरिता स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र, त्या देखील दूर करुन आता उत्तम नागरिक घडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. तर, महाराष्ट्रातील पाच हजार गरजू मुलींची जबाबदारी घेण्याकरिता पुढाकार घेणार आहे. पुढील ३ वर्षात समुदाय विकासाच्या दृष्टीने देखील उपक्रम राबविणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

रुलर स्कॉलर स्किममधील प्रियांका मोहिते म्हणाली, उस्मानाबाद येथील खेड्यातून मी पुण्यात शिक्षणासाठी आले. इयत्ता १२ वी नंतर माझे लग्न करण्याचा घरच्यांचा विचार होता. मात्र, अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशन माझे दुसरे पालक झाले आणि आज मी बीएमएस झाले आहे. फाऊंडेशनतर्फे मला सर्वोतोपरी आर्थिक सहाय्य मिळाल्याने ही वाटचाल मी करु शकले.अश्विनी लेम्भे म्हणाली, अनिरुद्ध देशपांडे यांचे अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशन आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सक्षम करत केवळ मदत करत नाही तर विद्यार्थी राष्ट्रीय गुंतवणूक म्हणून सिद्ध होतील, यासाठी ते कायम प्रयत्न करतात.

विवेक कुलकर्णी म्हणाले, पारधी समाजातील मुले ही अंध:कारात जगत होती. त्यांना शिक्षणाच्या प्रकाशाचे कोंदण अ‍ॅमेनोरा फाऊंडेशनने दिले आहे. यामध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्या सर्व संकल्पना असून त्याद्वारे आजपर्यंत ४९६ आरोग्य शिबीरे, १६६ सामाजिक शिबीरे, ५३ शैक्षणिक शिबीरे, ५१ पर्यावरणविषयक शिबीरे विनामूल्य स्वरुपात भरविण्यात आली आहेत. यापुढेही असेच कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!