विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारततर्फे‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार घोषित
पंचकन्या मेधा घैसास, मॉ. मंदाकिनी श्रीराम किंकर, कीर्तनकार ह.भ.प.सौ. भगवतीताई दांडेकर, समाजसेविका श्रीमती मीरा महार्जन व वारकरी श्रीमती विजयाबाई गोविंद कदम यांची घोषणा
पुणे, दि.३१ मे: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या अकाराव्या पुण्यस्मरण/ स्मृतिदिनाचे औचित्य साधून, ज्ञान-विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या थोर तपस्विनी कुलीन पंचकन्यांना (५) ‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती माईर्स एमआयटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड आणि विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पंचकन्यांमध्ये पुण्यातील थोर समाजसेविका श्रीमती मेधा सुरेश घैसास, अयोध्या येथील श्री रामायणम धाम आश्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व ज्ञान विज्ञान अध्यात्माचा प्रसार करणार्या विदूषी दीदी मॉ. मंदाकिनी श्रीराम किंकर, ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार ह.भ.प.सौ. भगवतीताई सातारकर-दांडेकर, थोर समाजसेविका श्रीमती मीरा महार्जन आणि थोर निष्ठावंत वारकरी व कवयित्री श्रीमती विजयाबाई गोविंद कदम यांचा समावेश आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, स्मृतिपदक व रोख रु. २१,०००/- (रुपये एकवीस हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार, दि. ३ जून २०२४ रोजी, दुपारी १२.३० वा. मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्या रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे.या समारंभासाठी जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच, माईर्स एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे ही उपस्थित राहणार आहेत.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे.
चौकट ः प्राणप्रतिष्ठापना सोहळा व मंदिराचे उद्घाटनसंपूर्ण भारतात मानवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्या लातूर येथील रामेश्वर (रूई) येथील श्री संत गोपळबुवा महाराज मंदिराचे पुनर्निमाण, भगवान महादेवाच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा व पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समाधी मंदिराचा उद्घाटन सोहळा ही आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ३ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
प्राणप्रतिष्ठापना सोहळा व मंदिराचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुरोहित मिलिंद राहुरकर गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगांवकर यांंच्या शुभ हस्ते कलशारोहण सोहळा होणार आहे. या प्रसंगी आर्यव्रत कराड, विरेन कराड आणि श्रीराम नागरे हे उपस्थित राहतील.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ विजेत्यांचा अल्प परिचय खालीलप्रमाणे -श्रीमती मेधा सुरेश घैसास ः संपूर्ण जीवनभर त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून आणि ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हे परमध्येय ठेऊन, अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले आहे. त्या पुण्यातील प्रतिथयश सर्जन वै. डॉ. सुरेश गोविंद घैसास यांच्या सुविद्य पत्नी आहेत. समाजातील तळागाळातील लोक तसेच कष्टकरी, शेतकरी व कामगार यांच्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवितात. त्या आजही जनतेची अव्याहतपणे सेवा करीत आहेत.दीदी मॉ. मंदाकिनी श्रीराम किंकरः अत्यंत समर्पित भावनेने, श्रद्धेने, निष्ठेने व खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानानुसार दीदी मॉ. मंदाकिनी श्रीराम किंकर अतिशय व्रतस्थ जीवन जगत आहेत. त्या थोर साधक व तपस्विनी पद्मभूषण पं. राम किंकर यांच्या कन्या व श्री रामायणम धाम आश्रम, अयोध्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन व ज्ञान विज्ञान अध्यात्माचा प्रसार करणार्या विदूषी आहेत.
ह.भ.प.सौ. भगवतीताई सातारकर-दांडेकरः नादब्रह्मऋषी ह.भ.प.वै. बाबा महाराज सातारकर यांच्या त्या कन्या आहेत. आपल्या सुश्राव्य व सुमधुर कीर्तनाच्या माध्यमातून माऊलींची ज्ञानेश्वरी व हरिपाठ, जगद्गुरूंची गाथा, नाथांचे भारूड व भागवत या ग्रंथांचे आयुष्यभर चिंतन, मनन व त्यानुसार आचरण त्यांनी केले आहे. अत्यंत मधुर स्वरामध्ये त्या प्रवचन व कीर्तन अतिशय तन्मयतेने त्या सादर करतात. गेली अनेक वर्षे त्या आषाढी व कार्तिकी वारी नित्यनियमाने करीत आहेत.
श्रीमती मीरा महार्जन ः ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हे जीवनाचे परमध्येय ठेवले आहे. त्यासाठी त्या अहोरात्र कार्य करीत आहेत. पीडित, दुखी व्यक्तींच्या चेहर्यावर हास्य आणण्यासाठी त्या जीवाचे रान करतात. त्याचेच उदाहरण म्हणजे २०१५ या वर्षी नेपाळ येथे भूकंप आला होता. तेव्हा पीडितांच्या सहाय्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करून त्या नागरिकांना साहरा दिला.
श्रीमती विजयाबाई गोविंद कदमः मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धिचे कारण ॥ जे जे भेटे भूत । तयासि मानिजेे भगवंत ॥ या उक्तीचे मूर्तिमंत प्रतीक असेच जीवन त्या जगत आहेत. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगदगुरू तुकाराम महाराज व पंढरीचा पांडुरंग यांच्यावर त्यांची नितांत श्रध्दा व अपार भक्ती हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या निष्ठावंत वारकरी आहेत. त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक सारख्या कित्येक ज्वलंत विषयांवर कविताही रचल्या आहेत.