कोंढवा: पुण्यातील जय महेश मंच तर्फे शनिवार दिनांक १५ जून रोजी विविध कार्यक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले होते. सकाळी यशोधन सोसायटी येथील मंदिरात शिव अभिषेक व पूजन करून शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना प्रसाद म्हणून नाष्टाच्ये देखील वाटप मंच्याच्या वतीने केले.
सजवलेल्या रथात भगवान महेश, पार्वती माता व श्री गणेश यांची वेशभूषा केलेल्या बालकांची ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यशोधन सोसायटी येथून निघालेल्या मिरवणुकीचा कोंढवा रोड, शांतीनगर सोसायटी मार्गे साळवे गार्डन येथे समारोप करण्यात आला.मिरवणुकीतील उंड, घोडे आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला-पुरुषांनी नृत्याचे सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साळवे गार्डन मध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महा NGO चे शेखर मुंदडा यांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल JMM इन्स्पिरेशनल आयकॉन पुरस्कार तर कला व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशा बद्दल सीए भूषण तोषणीवाल यांना देखील JMM इन्स्पिरेशनल आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमा प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माहेश्वरी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, JMM चे कमिटी मेंबर, समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान चार ज्योतिर्लिंगांचा इतिहास सांगणारे नाटिका देखील सादर केला गेली. तर संस्कार समीक्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.