भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे ॲड. अभय छाजेड यांना संविधान रत्न पुरस्काराने गौरव
संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत जाण्याचे आवाहन
पुणे : संविधान टिकले तरच देशातील लोकशाही टिकणार आहे; त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत संविधान टिकविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, संविधानामुळे मिळालेले अधिकार टिकवून ठेवण्यासाठी सर्वसामान्य जनतेर्यंत जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. कामगार कायदे संपविणारे केंद्र सरकार दोन भांडवलदारांसाठी सत्ता राबवित आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड आणि संविधानवादी कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचा आज (दि. 21) संविधान रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण थोरात यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते.
भारतीय संविधान दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त दि. 21 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत संविधान साक्षरता मोहीम आयोजित करण्यात आली असून या उपक्रमाअंतर्गत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर तसेच लता राजगुरू, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, रमेश बागवे, अरविंद शिंदे, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, निरपेक्ष भावनेने काम करीत असलेल्या ॲड. अभय छाजेड व प्रतिभा शिंदे यांची पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य आहे. पुरस्कार हे त्यांच्या कष्टाचे सार आहे. ते पुढे म्हणाले, संविधानामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले आहेत. ते टिकून राहण्यासाठी संविधान टिकणे गरजेचे आहे.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, संविधानाला धर्म नसतो. संविधानाचे पावित्र्य जपण्याचे कर्तव्य प्रत्येकाला बजवावे लागणार आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून संविधानाला धक्का लावला जात आहे.
सध्याची राजकारण व्यवस्था मूल्यविरहित झाली आहे. धर्मापेक्षा संविधान महत्त्वाचे आहे, अशी शिकवण देण्याची वेळ आली आहे. घर घर तिरंगाबरोबरच घर घर संविधान पोहोचविण्याची आवश्यकता आहे.संविधान रत्न पुरस्कार समानतेचा संदेश देणारा असल्याची भावना प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली.
संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप ॲड. अभय छाजेड यांनी केला. रमेश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले.सुरुवातीस सचिन ईटकर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद करीत पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार लता राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आला.