पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

आम्ही पुणेकर व परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

आज पत्रकारिता जगणारे पत्रकार पाहिजेत; खासदार श्रीनिवास पाटील यांचे मत

पुणे : कारवीची फुले साठ वर्षांनी फुलतात. त्यातील मध काढला जातो. परंतु दरवर्षी न फुललेली कारवी फुलली समजून त्यातील मधात भेसळ होते, तशी आज पत्रकारीतेत भेसळ होत आहे. पण आयुष्यभर पत्रकारितेसाठी जगणारे लोक देखील पाहिले. भविष्यात देखील असेच पत्रकारिता जगणारे लोक झाले पाहिजेत, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनाननिमित्त पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त परिवर्तन ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन गांजवे चौकातील पत्रकार भवन येथे करण्यात आले. यावेळी पत्रकार कर्म तपस्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, परिवर्तन ट्रस्ट डाॅ. शैलेश गुजर, श्याम दौंडकर, समीर देसाई आदी उपस्थित होते. यावेळी रामभाऊ जोशी, पं वसंत गाडगीळ, श्याम अग्रवाल, जयराम देसाई, डॉ. किरण ठाकूर अनंत बागाईतकर, मोरेश्वर जोशी, हेमंत जोगदेव, एकनाथ बागुल, अशोक डोंगरे, दिनकर देसाई, प्रतिभा चंद्रन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, शाल, आरोग्य किट प्रदान करण्यात आले. श्रीपाल सबनीस म्हणाले, टिळक, आगरकर, आंबेडकर, महात्मा गांधी यांची पत्रकारीता ही इतिहास जमा झाली आहे. आज सत्यनिष्ठ पत्रकारिता राहिली नाही. आज पत्रकारिता विकली गेली आहे. सत्य बाहेर न येता भांडवलशाहीला उपयुक्त असणारे सत्य समोर येते. सत्याची मांडणी अशा प्रकारे झुकलेली असेल तर लोकशाहीचा आत्मा मारण्याचे पाप आपल्या सर्वांवर देखील येते. ही पत्रकारिता शुद्ध ठेवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांची आठवण ठेवली पाहिजे.

समाज सुधारण्याच्या दृष्टीने शुद्ध भूमिका बजाविण्याची आवश्यकता आहे. शुद्ध पत्रकारिता टिकवण्यासाठी पत्रकारांनी सौदेबाजी रोखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.शैलेश गुजर म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. केवळ पत्रकारितेसाठी आपले संपूर्ण आयुष्य घालविणारे आणि त्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जेष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्याचा उपक्रम राबविला.

पुरस्काराला उत्तर देत पंडित वसंत गाडगीळ म्हणाले, पत्रकारिता ही अती प्राचीन असून रामायण महाभारतापासून दिसते. त्या वेळचे पत्रकार म्हणजे ऋषीतुल्य नारदमुनी हे होते. पत्रकारिता ही व्यवसायासाठी नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत जगायची असते. जो शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारिता जगतो तोच खरा पत्रकार आहे, असेही त्यांनी सांगितले.

रामदास मारणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेश गुजर यांनी प्रास्ताविक केले आणि समीर देसाई यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!